Wednesday, March 15, 2017

मी जगून पाहिलंय


15th March is my dad's birthday. I am reproducing one literary gem from the timeless archives of his philosophical writings.

असं कार्य मी करून पाहिलंय
ज्याची कदर कधी होत नाही
असा स्वार्थ मी सोडून पाहिलाय
ज्याला त्याग कुणी म्हणत नाही

असं खरं मी बोलून पाहिलंय
जे कधी कुणाला पटत नाही
असा धर्म मी झुगारून पाहिलाय
जो मनाला मोठं करीत नाही

असा विश्वास मी टाकून पाहिलाय
ज्याला किंतु कसा शिवत नाही
अशा बेअब्रूत मी बुडून पाहिलंय
ज्यातून वर कुणी निघत नाही

अशा आगीत मी जळून पाहिलंय
जिची हाळ कुणाला लागत नाही
असं मरण मी मरून पाहिलंय
ज्या मर्तिकाला कुणी जमत नाही

असा प्रवास मी करून पाहिलाय
ज्यात खंड कधी पडत नाही
असं वाळवंट मी पार केलयं
ज्यात ओऍसिस कुठं दिसत नाही

अशा मार्गानं मी चालून आलोय
ज्यात मदत कुणाची मिळत नाही
असं अंतर मी कापून काढलय
जे लक्षात कुणाच्या येत नाही

असं काहीतरी मी मिळवून पाहिलंय
जे सहसा कुणाला लाभत नाही
असं जीवन मी जगून पाहिलंय
जे वाया कधीच जात नाही

- यशवंत रायकर (बडोदा)